‘मी आहे की नाही यावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी ही उपदेशात्मक लहानशी गोष्ट डॉ. डब्लू डायर यांच्या ‘युवर सॅक्रेड सेल्फ’ या पुस्तकात देण्यात आली आहे. आईच्या गर्भाशयातील दोन जुळ्या जीवांचा हा काल्पनिक संवाद आहे.
पहिला:काय रे ? प्रसुतीनंतरही जीवन असते यावर तुझा विश्वास आहे का ?
दुसरा: होय ! प्रसुतीनंतर काही तरी असलेच पाहिजे. कदाचित उद्याच्या त्या जीवनाची तयारी करण्यासाठी आज आपण इथे आहोत.
पहिला: मूर्खपणा आहे हा ! प्रसुतीनंतर जीवन नाही. कशा प्रकारचे जीवन असू शकते ?
दुसरा: मला माहीत नाही, परंतु तिथे इथल्यापेक्षा अधिक प्रकाश असेल. तिथे कदाचित आपण आपल्या पायांनी चालू शकू, आपल्या तोंडाने खावू शकू. तिथे आपल्याला अधिक जाणीवा असतील ज्या इथे नाहीत.
पहिला: हे सारे हास्यास्पद वाटते. आपण चालणे शक्य नाही. आणि आपल्या तोंडाने खाणे ? निव्वळ कपोलकल्पित आहे. आपल्याला अन्नपाणी आपल्या नाळेतून मिळते. परंतु ती नाळ फारच आखूड आहे. म्हणून प्रसुतीनंतर तार्किकदृष्ट्या जीवन असण्याची शक्यता नाही.
दुसरा: मला वाटते प्रसुतीनंतरचे जीवन इथल्यापेक्षा वेगळे असेल. कदाचित तिथे आपल्याला नाळेची गरजच भासणार नाही.
पहिला: शुद्ध मूर्खपणा ! तिथे जर जीवन असेल तर तिथून आजपर्यंत कुणीही परत कसे आले नाही ? प्रसुती हाच आपल्या जीवनाचा शेवट आहे. त्यानंतर फक्त अंध:कार, भयान शांतता आणि कायमची विस्मृती ! प्रसुतीनंतर आपले अस्तित्व राहात नाही.
दुसरा: मला नक्की माहीत नाही. परंतु तिथे आपल्याला आपली आई भेटेल. आपली पुढची काळजी तीच घेईल.
पहिला: आई ? तुझा आई संकल्पनेवर खरच विश्वास आहे ? जर आई आहे, तर मग आता ती कुठे आहे ?
दुसरा: आई आपल्या भोवती सगळीकडे आहे. आपल्या आत आणि बाहेर तीच आहे. आपण तिचे आहोत आणि तिच्यामुळेच आपण आहोत. तिच्याशिवाय आपले जग असणार नाही, असू शकत नाही.
पहिला: ठीक आहे. परंतु ती मला दिसत नाही म्हणजे ती नाही हेच तार्किक सत्य आहे. ती असती तर मला दिसली असती !
दुसरा: कधी कधी आपण शांत असतो, एकाग्रचित्त असतो, ज्या क्षणी आपले स्वतंत्र अस्तित्व विसरलेले असते त्या क्षणी तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. तिचा मंजूळ, प्रेमळ आवाज ऐकू येतो, तिचा वात्सल्यपूर्ण स्पर्श जाणवतो. कदाचित आपली हालचाल, हुंकार तिलाही जाणवत असतील…
या जगात येण्यापूर्वी मी कुठे होतो ? माझ्या या जगात येण्याचे प्रयोजन का ? यानंतर मी कुठे जाणार आहे ? हा ‘मी’ कोण आहे ? ज्यांना या प्रश्नांची उत्तरे मिळतात तेच स्वत:ला ओळखतात. एरवी आपण ज्याला सतत ‘मी’ म्हणत असतो, तो ‘मी’ नसतोच मुळी !